लेखक : श्री.प्रकाश नारकर
श्री.संदिप परब
प्रस्तावना :
शिवछत्रपतीनी दूरदर्शीपणे निर्मिलेल्या सागरी सत्तेचा परिणाम एका ऐतिहासिक सत्याने व्यक्त होतो. पूर्व किनाऱ्यावरील बंगाल व मद्रास यांच्या तुलनेने पश्चिम किनाऱ्यावरील आपली सत्ता उभारायला, परकिय सत्ताना सुमारे १०० वर्षे अधिक लढावे लागले. कान्होजी, सेखोजी, संभाजी, तुळाजी व आनंदराव धुळप या दर्या सारंगानी शिवछत्रपतीच्या आरमारी सामर्थ्यांच्या साहाय्याने मोठ्या समर्थपणे ‘‘इंग्रजाशी झुंज’’ दिली. डग्लस जेम्स या इंग्लिश इतिहासकाराने आपल्या ‘‘ बॉम्बे अँड इंडिया ’’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रप्रेम, सामर्थ्य आणि दरारा निर्माण करणाऱ्या आरमाराच्या निर्मितीच्या जिद्दीचे वर्णन थोडेसे खवचटपणे पुढीलप्रमाणे केले आहे.
‘‘शिवाजी हा स्वतः दर्यावदी नव्हता. ही देवाची मोठी कृपाच मानावी लागेल. नाहीतर जमिनीवर जसा त्याने हैदोस घातला होता, तसाच त्याने समुद्रावर धुमाकूळ माजविला असता तरीही त्याने काही कमी नुकसान केले नाही. सागराचे त्याला एवढे मनापासून आकर्षण होते की, तरूणपणीच त्याने बाणकोटच्या खाडीवरील महडजवळ आपला मुक्काम ठोकला होता. मालवण येथील सिंधुदुर्ग उभारतांना त्याने स्वतः जातीने काम करून आपले हात मातीने भरवून घेतले होते.’’१
उपरोक्त उल्लेखातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी समारंभाकरिता जानभट अभ्यंकर व दादंभट उपाध्ये यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाचारण केले होते. परंतु आदिलशाही शासकाच्या भीतीमुळे याकार्यास येण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी छ. शिवाजी महाराजांनी त्यांना अभय व संरक्षण दिल्याने त्यांनी हे कार्य सिद्ध केले होते. यापैकी जानभट अभ्यंकर घराणे हे आजही मालवणामध्ये वास्तव्यात असून त्यांच्या वंशजानी छत्रपतीवरील आपली राजनिष्ठा वेळोवळी आपल्या सेवेने वृध्दीगत केली. प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून मालवण येथील अभ्यंकर घराण्याची अधिक माहिती करून घेण्याचा हा प्रयत्न होय.
१. अभ्यंकर घराण्याची माहिती व वंशावळ :
मालवण येथील अभ्यंकर कुटुंब हे छ. शिवाजी महाराजांची स्वारी मालवणास येण्या अगोदर पासूनच मालवणांत स्थायिक होते. हे कुटुंब गुहागर किंवा कुर्धे या ठिकाणावरून उत्तरेकडून मालवणात आले असावे.२ आजही याचे वंशज देऊळवाडा मालवण येथे वास्तव्यास आहेत. या घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणे आहे.३

२. जंजिरे सिंधुदुर्ग निर्मिती संदर्भातील पार्श्वभूमी :
- डच, पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज या परकीय सत्तावर दहशत निर्माण करायची तर समुद्रावर आपली सत्ता प्रस्थापित करायला हवी. असा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५९ मध्ये मराठ्याच्या आरमाराची मुर्हूत मेढ रोवली.
- आरमाराचा तळ असलेली बंदरे प्रामुख्याने संरक्षण आणि आक्रमणाच्या दृष्टीने सोयीस्कर अशा ठिकाणी असत.आरमारी काफिल्यातील विविध तऱ्हेची जहाजे बांधणे, दुरूस्त करणे, दारूगोळा, पाणी, इंधन इतर भंडार याचा पुरवठा, हालचाली, संचालन केंद्र इत्यादीच्या सोयी ह्या बंदरात असत.
- या काळात मालवण मुलखात मुसलमान अरब व्यापारी आणि आदिलशाही सरदारांचा तेथील रयतेला फार छळ सहन करावा लागत होता. या छळातून रयतेला मुक्त करणे आवश्यक होते.
- मालवण येथील समुद्रावर आरमारी तळ उभारणे गरजेचे होते. मालवण बंदर हे व्यापारी आणि आरमारी तळ या दोन्हीही बाबीत उपयुक्त असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण पासून १.५० किलोमीटर समुद्रात सिंधूदुर्ग किल्ला उभारण्याचे योजिले होते.४
३. जंजीरे सिंधुदुर्ग भूमिपूजन सोहळ्याच्या पौरोहित्याची हकीकत :
- बसनूर प्रांती मोहिम करण्याहेतुने छत्रपती शिवाजी महाराज कुडाळ प्रांती जमावनिशी आले असता मालवण येथील दर्यामध्ये कुरटे नावाचे बेट दृष्टीस पडले. महाराजांनी या बेटावर तात्काळ जंजिरा बांधण्याचा निर्णय घेऊन दि. २५/११/१६६४ रोजी चीरा भूमीमध्ये बसवून जंजिऱ्याचे सिंधूदुर्ग असे नामकरण केले.
- या भूमीपूजन सोहळ्याचे पौरोहित्य छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील जानभट अभ्यंकर व दादंभट उपाध्ये या मामा भाच्यांना करावयास सांगितले या हकिकतीचा उल्लेख प्रस्तुत करिन्यात पुढीलप्रमाणे आहे. ‘‘महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी यांनी राज्य आक्रमण करीत असता कुडाळ प्रांतास जमाव पाठवून काही मुलूख व आदस्त करिता लावले. प्रांत मजकुरी होती. ते समयी महाराज राजश्री बसनूर प्रांत मोहिम करावया निमित्य आरमाराच्या जमावानिशी मौजे मजकूर एथें आले. त्या उपर दर्यामध्ये बेट (मौजे मजकूर एथें आले.) नजीक दृष्टीस पडले तेव्हा या बेटाचे नाव काय म्हणून पुसिले, त्यावर कृष्ण सावंत देसाई व भानजी प्रभु देसाई प्रांत मजकूर यांनी सांगितले की, या बेटांचे नाव कुरटे असे सांगितले.त्यावरी राजश्री स्वामी बेटावरी येऊन जागा पाहिला. ते स्थळ उत्तम विर्स्तीण आटोपसारखे दिसले. त्या उपरी राजश्री स्वामींनी आज्ञा केली की या जागी बिलंद किल्ला बांधून वसवावा, म्हणून आज्ञा करून किल्ला बांधावयास हुकूम केला आणि आरमारच्या जमावानिशी राजश्री स्वामीनी बसनूरावरी मोहिम केली. जंजिरा बांधावयास राजश्री स्वामीनी मुहूर्त करिते समयी पंडितराव व उपाध्ये ज्योतिषी होते. तथापि आज्ञा केली की पेस्तर संपूर्ण प्रांत हस्तागत करणे आहे हे कृत्य होतच आहे. ऐशियास गांवीचा उपाध्या असवा म्हणून आपणांस व आपला मामा जानभट अभ्यंकर उपाध्ये मौजे मजकूर असे दोघांस धरून आणून छ १४ जमादिलावल सन खम्मस सितैन मार्गशीर्ष बहुल २ ते दिवशी किल्ला बांधण्यास मुहूर्त करून चिरा भूमीमध्ये बसविला; आणि सिंधुदुर्ग असे नाव ठेविले. आपणांस व आपला मामा जानभट यांस राजश्री स्वामींनी सांगितले की तुम्ही ब्राह्मण या जागी सुखरूप राहणे, कांही शंका मनामध्ये न धरणे. प्रांत मजकूर हस्तगत जहालाच आहे काही किंचित आदिलशाही कुडाळापासून मामले फोंड्यापर्यंत ठाणी आहेत ती दहशत खाऊन जातील. महाराज राजश्री स्वामींचे राज्य प्रबळ होत आहे. चिंता न करणे, म्हणून अभय देऊन सांगितले. त्याउपर आम्ही एथे राहिलो.’’५

(मोरयाचा धोंडा: – आपण आजही निरखून पाहिल्यास या दगडावर त्याकाळी कोरलेल्या विघ्नहर्ता गजाननाचे, चंद्र सूर्य, शिवलिंग- नंदी व पादुका यांच्या स्पष्ट कोरलेल्या प्रतिमा दिसून येतात.६ दि. ३०-०५-२०१७ रोजी किल्ले सिंधूदूर्ग प्रेरणोत्सव समिती, सिधुदुर्ग यांनी विभागीय आयुक्त कोकण भवन यांना सदर ‘‘ मोरयाचा धोंडा ’’ या ऐतिहासिक शिवकालीन वास्तूचे वापरातील सुमारे ४० आर क्षेत्राला स्वतंत्र सर्व्हे नंतर देऊन सातबार उतारा तयार व्हावा या संदर्भातील विनंती अर्ज दिला असता. मा. श्री. प्रभाकर देशमुख यांनी मा जिल्ह्याधिकारी सिंधूदुर्ग यांना संबंधित अर्जावर कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर सदर मोरयाचा धोंडा या वास्तूसाठीचे ४० आर हे क्षेत्र असलेला सर्व्हे क्र १४४३ हा सातबारा मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन हे नाव दाखल करून घडविण्यात आला. तसेच मा. मुख्यालय सहाय्यक, उपअधिक्षक, भूमि अभिलेख मालवण यांनी सदर सर्व्हे नंबर नुसार सर्व्हे करून ‘‘मोरयाचा धोंडा’’ असलेल्या क्षेत्राचा नकाशाही तयार केला. उपरोक्त कार्यवाही संदर्भातील पत्र, सातबारा व मोजणी नकाशा सोबतच्या छायाचित्रात दर्शविलेआहेत.७)

४. ग्रामजोशी यांना मिळालेल्या सनदेचा उल्लेख असलेल्या शिलालेखातील अभ्यंकरांचा उल्लेख :
मालवण येथील ग्रामजोशींना दिलेल्या सनदेतील मजकूर शिलालेख म्हणून कोरण्यात आलेला होता. या ग्रामजोशींना घराकरिता दिलेल्या जागेच्या चर्तुसीमा सदरिल शिलालेखात नमूद असून त्यापैकी दक्षिणेस जानभट अभ्यंकरांची ‘मोडणीची मेर’ असा उल्लेख प्रस्तुत शिलालेखात असून सदरचा शिलालेख पुढीलप्रमाणे आहे.
ओळ क्र. मजकूर
२१ ऐसा जे वाडी दुर्गवाडी दुर्गादेवी भीतर आहे ते मोडून तुम्हास
२२ घर करून राहावेयासी दत करून दीले त्याच चतुर्सीमा पूर्वी
२३ दीसे व्हालाची मेर (हद्द)१पछीस दीसे डोंगराची गारेची मेर१दक्षीणे दीसे जानभट
२४ अभ्यंकराचे मोडणाची मेर१उत्तर दीसे सोन गावडा गावकर याचे मोडणाचे मेर१
२५ या चतुर्सीमामधील जमीन व्हावटा गलवाडौनु पडिली होती त्या मधील
२६ माड व फणस व हरजीनस झाड आहेत व जी कराल ती व ते जमीन तुमास दत इनाम
२७ पटा करून चंद्रार्कवेरी दीधली आहे व ती जमीन खारीचे खाजन
२८ तेसेत दत इनाम करून दीधले असे त्याचे चतुर्सीमा पूर्व दीसे भोग।मेर१
२९ दक्षेण दीसे बाल सेणवी कुलकर्णी याचे सेताची मेर१ पछीम दीसे घाडियेचे सेताची
शिलालेखाचे वर्णन
- स्थान : ग्रामजोशी यांचे घर.
- भाषा : मराठी व स्थानिक मालवणी
- प्रयोजन : इनामपटा व गावपटा यांची कायमस्वरूपी प्रत तयार करणे.
- मिती / वर्ष : १६१५ श्रीमुखनाम संवत्सरे चैत्र वद्य सप्तमी, रविवार.
- इंग्रजी साल / तारीख : १६ एप्रिल १६९३.
- काळ : सतरावे शतक
- कारकीर्द : कारकीर्द – छत्रपती राजाराम महाराज
- व्यक्तिनाम : जानभट अभ्यंकर
- स्थलनाम : मौजे मालवण ता (तर्फे किंवा तपे) मसुरे पा (प्रांत) कुडाल, दुर्गवाडी
- शिलालेखाचा वाचक : इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
- प्रकाशन : राजवाडे लेखसंग्रह भाग २. संपादक शं.ना. जोशी, पृष्ठ २१५ ते २१७
- शिलालेखाचे महत्व : मालवण येथील ग्रामजोशीला दिलेल्या सनदेतील मजकूर, शिलालेख म्हणून कोरण्यात आला आहे हे याचे वेगळेपण आहे. एखाद्या शिवकालीन व्यक्तीचे जानभट अभ्यंकर कागदपत्रामधून आलेले नाव पुढे राजाराम काळातील एका शिलालेखात यावे हे विशेष आहे आणि तेच याचे महत्व आहे.८
५. जानभट यांचे पुत्र कृष्णभट अभ्यंकर यांचे व दादंभट यांच्यातील वाद :
- जानभट अभ्यंकर यांनी दादंभट हे अपंग असल्याने जंजीरे सिंधुदुर्गाचे उपाध्येपण त्यांनी करावे असे सांगितले व त्याप्रमाणे ते मालवणात जाऊन राहिले. कुडाळ प्रांती मोगलाचे आक्रमण झाले असता या धामधुमीच्या काळात जानभट अभ्यंकर मालवण सोडून निघून गेले. काही काळानंतर म्हणजेच राजाराम महाराज छत्रपती झाल्यानंतर रामचंद्र पंत अमात्य यांनी कुडाळ प्रांत पुन्हा मोगलाकडून सोडून घेतला.
- सर्व प्रांतात स्थिरता आल्यावर जानभट अभ्यंकर यांचे पुत्र कृष्णभट पुन्हा मालवणात येऊन जंजीर सिंधूदुर्गाच्या उपाध्येपणावरून दादंभट उपाध्ये यांच्याशी वाद घालू लागले. यासंदर्भातील करिन्यातील उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. ‘‘आपला मामा जानभट याणी आपणांस सांगितले की तू म्हणजे एका पायांने क्षीण आहेस. तुझे वस्तु हरकोठे जावते येवते असा अर्थ नाही. तू एथें राहणे जंजिराचे उपाध्येपण चालविणे. जो उपाय होईल त्यावर आपला योगक्षेम करणे म्हणून सांगितले. त्या गोष्टींस आपण मान्य होऊन या स्थली राहिलो. आपला मामा जानभट मालवणी जाऊन राहिला. महाराज राजश्री स्वामींचे राज्य प्रबळ होऊन कुडाळापासून फोंड्या कडेवाड शिवेश्वर देवाचे महाल पर्यंत ठाणी बसविली. आदिलशाही ठाणी निःशेष निषेत गेली. आपल्या मनाच्या ठायी निर्धार जाहला जे, या उपर आदिलशाईचा प्रसंग होत नाही. हेच राज्य प्रबल जहाले असा निश्चय चित्ताचे ठायी केला आणि या जागी राहिलो. त्या उपर आपला मामा जानभट याणी ही जंजिरा वास्तव्य केले. परंतु उपाध्यायपणाचा व्यवहारसोध्ध जे कर्तव्य तें आपणच करीत होतो. जानभटामध्ये व आपणामध्ये भिन्नता नव्हती. असे असतां महाराज राजश्री संभाजी राजे तत्कारूढ जहाले. त्या उपर सहा सात वर्षांनी शामल तांब्र फौजेनिशी प्रांत मजकुरी आला. त्यामुळे संपूर्ण प्रांत उध्वस्त जाहाल. कितेक मनुष्यें निघोन गेली. जानभट आपला मामा मालवणामध्ये कुटुंबसह होता, तो तांब्राच्या धामधुमी करिता परागंदा होऊन गेले. कुडाळ प्रांती संपूर्ण धामधुमी जहाली त्या उपरांतिक खेम सावंत देसाई प्रांत मजकूर यांणी महाराज राजश्री स्वामीच्या राज्याची निष्ठा सोडून तांब्राचा अवलंब धरिला आणि तांब्राकडील फौजदार महम्मद आवास व अब्दुल रजाख यांस जमावानिशी कुडाळास आणिले. त्यांच्या स्वाऱ्या मुलखामध्ये होत्या. एक वेळ मौजे मजकुरी स्वारी येऊन कित्येक लुटी नागाव करून मनुष्ये धरून नेली. मौजे मजकुरचे देव श्रीनारायण व रामेश्वर एथे गोवध करून देवस्थानें भ्रष्ट केली.राजश्री राजाराम चंदी प्रांती असतां राजश्री रामचंद्र पंडित अमात्य विशाळगडी राहून संपूर्ण तांब्र कोकण प्रांत प्रवेश केला होता त्यास दहशत लावून निःशेष घालविला. कुडाळ प्रांतही राजश्री नरहर कृष्ण मुतालिक दिII पंत प्रतिनिधि व राजश्री सखोजी नाईक जगताप यांस जमावासह वर्तमान पाठवून खेम सावंत यांस हाती घेऊन कुडाळी मोगल होता तो पराभवाते पाठविला. प्रांत मजकूर कुहादस्त जहाला. मनुष्यास जाण्यास व मुलुखगिरी मध्ये रहावयास जागा जहाला. सुमिक्ष काल दृष्टीने पाहिला. त्या उपरातिक ईश्वरी इच्छेनुरूप होणारा सारखे कालचक्र प्रसंग सन आर्बा तिस्सैना मध्ये महामारीचा प्रसंग जंजिरा प्राप्त जाहाला. ते समयी उपलग मनुष्ये जितकी होती तितकी काही मेली व काही गेली. जंजिराच्या लोकांची तर घरे बुडाली ते समयी आपण जातो तर कोणी नको न म्हणते. परंतु आजपर्यंत येथे राहून काळ दुष्काळ काढून या लोकांस सोबत दिली. त्यास अशा प्रसंगास टाकून गेल्यावर ईश्वर बरे पहाणार नाही, म्हणून निर्धार करून पाहिला होणार प्रसंग चुकत नाही. परंतु काही बुद्धिवाद सांगावा. दैवी मानवी उपाय करून अरिष्ट दूर करावे. म्हणून लोकांस व सुभानजी नलावडे मुद्राधिकारी यांस सांगितले आणि कितीएक शांती केल्या, व मौजे मजकूरचे देव तांब्र यांनी भ्रष्ट केले आहेत त्यांची हि अर्चाशुद्ध करावी म्हणून सांगितले आणि कितेक शांती केल्या आणि दोन देवस्थाने अर्चाशुद्ध शास्रसंमते बोलिले आहेत त्याप्रमाणे करून देवस्थापना केली. त्यावरून मौजे मजकुरचे ग्रामस्थ यांनी देवासनिध उभे राहून संकल्प केला की, देवा, तुझी स्थापना या ब्राह्मणाने केली, हा मौजे मजकुरचा उपाध्या परंतु या समयी अधिक काही द्यावे म्हणून समस्त ग्रामस्त मिळून दोन देवालयांचा अभिषेक आपणांस देऊन वृत्ति भूमीपत्र करून दिले. उपाध्येपण गांवचे व किल्याचे इस्तकबील पासून आजपर्यंत करीत असो असे असता कृष्णभट महाजन जानभटाचे गोत्र पुरूष हे मौजे मजकुरी येऊन राहून आपणा समागमे उपाध्येपणांचा खटला करू लागला.’’९
६. कृष्णभट अभ्यंकर यांस मिळालेल्या ग्राम उपाध्येपणाच्या सनदेची माहिती :
कृष्णभट अभ्यंकर व दादंभट अभ्यंकर यांच्यातील वाद सरकार दरबारी गेला असता प्रस्तुत करिन्यातील उल्लेखानुसार जंजिऱ्याचे व तेथील रहात असलेल्या लोकांच्या घरचे उपाध्येपण दादंभट व मौजे मालवण येथील ग्रामउपाध्येपण कृष्णभट अभ्यंकर यास देण्यात आले. यासंदर्भातील उल्लेख प्रस्तुत करिन्यात पुढीलप्रमाणे आहे. ‘‘जंजिऱ्याच्या उपाध्येपणाचे पत्र करून दिले असे, तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने जंजिऱ्याचे उपाध्येपण दिवाण संबधिक व लोकांच्या घरचे करीत जाणे. जंजिराचे उपाध्येपणास दुसऱ्यास संबंध नाही. आपले समाधान असू देणे. मौजे मालवण येथील ग्रामसंबंधिक उपाध्येपण आहे त्यांचा अनुभव तुम्ही व कृष्णभट महाजन घेत जाणे जाणिले. ’’१०
७. अभ्यंकर घरण्याकडे चालत आलेले अधिकारः
- कृष्ण गोपाळ अभ्यंकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधूदुर्ग किल्ल्यातील छ. शिवाजी महाराजांच्या देऊळातील नित्यपूजा व नैवेद्य दाखवण्याचे अधिकार त्याचेकडे होते. त्याकरता त्यांना कोल्हापुर संस्थानाकडून देणगी रू. १००/- मेहनताना म्हणून मिळत होता.
- मालवण देऊळवाडा येथील श्री नारायण, रामेश्वर आणि सातेरीदेवी यांच्या पालखीस खांदे देण्यासाठीचा अधिकार त्याचे घराण्याकडे होता व त्याकरिताचे प्रतिवर्षीचे रू ८०/- हे त्यांना मिळत होते.
- मालवण येथील धुरीवाडा ते वायरीपर्यंत भिक्षुकी करण्याचे अधिकार पूर्वीपासून त्याच्या घराण्याकडे चालत आलेले आहे.त्या हद्दीबाहेर भिक्षुकी करण्याचा अधिकार त्याचे चुलत बंधू श्री केशव विष्णू अभ्यंकर यांचे घराण्याकडे होते. यापैकी काही अधिकार छ. शिवाजी महाराजांनी दिलेल्या ताम्रपटानुसार होते. परंतु १९२८ साली खेर मंत्री मंडळातील मा लठ्ठेसाहेब यांच्या कमिशनने अभ्यंकरकडील हे अधिकार रद्द केले व लोकांनी त्यांचे इच्छेनुसार कोणाही बाहम्रणास आपल्या घरी याज्ञिकी करण्याकरिता बोलवावे असा निकाल दिला.११

८. अभ्यंकर घराण्यास मिळालेल्या इनाम जमिनीबाबतः
छ. शिवाजी महाराजाची पूजा आणि देवांची पालखी याकरिता बरीच जमिन अभ्यंकर घराण्यास इनाम मिळालेली होती. परंतु त्यापैकी आता अगदी थोडीच जमिन त्याचे घराण्याकडे आहे.१२

९. अभ्यंकर घराण्याचे सद्यस्थितीतील वारस व त्याचे मालवणातील घर :
सद्य स्थितीत श्री योगेश महेश्वर अभ्यंकर हे ३०१६ देऊळवाडा ता. मालवण येथील जानभट अभ्यंकराच्या वशंपरपंरागत घरामध्ये राहतात ते नोकरी निमित्त बोरीवली, मुंबई येथे राहत असून त्याच्या घराचे छायाचित्र व त्याच्या वडिलांच्या तसेच चुलत्याच्या नावे असलेले सदर घराचे असेंसमेंट पुढील छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे आहे.१३

निष्कर्ष :-
करिन्यानुसार छत्रपती कडून मिळालेले उपाध्येपणाचे अधिकार व कुलवृतांतानुसार यासेवेकरिता मिळालेल्या इनाम जमिनी तसेच सद्यस्थितीत वंशावळीनुसार जानभट अभ्यंकराचे वंशजांच्या नावे असलेल्या जमिनी व वास्तव्यास असलेले मालवणातील घर या सर्वांचा विचार करता सदरचे घराणे हे जानभट अभ्यंकर यांचेच आहे हे सिद्ध होते.
संदर्भ व टिपा :
१. म.सो. कांत, बंदर विकास व नौका नयन, म.रा.सा.आ.सं.मं. मुंबई, १९८७, पृ
२. ज. द. अंभ्यकर,अभ्यंकर कुलवृतांत भाग १ व २, रामकृष्ण अभ्यंकर, ठाणे, १९९१, पृ.२९१
३. कित्ता पृ. २९१.
४. माधव कदम, असा हा सिंधूदुर्ग, युनिक प्रकाशन, सिंधुदुर्ग, २०००, पृ . ४९
५. अप्पासाहेब पवार, ताराबाई कालीन कागदपत्रे, शिवाजी विद्यापिठ, कोल्हापूर, पृ . ३,४
६. रामेश्वर सावंत, शिवलंका,रामेश्वर सावंत, २००६, पृ.१५
७. श्री गुरू राणे यांची दि . १९/०९/२०२० घेतलेल्या मुलाखतीनुसार
८. महेश तेंडुलकर, शिलालेखाच्या विख्यात, स्नेहल प्रकाशन,पृ.५०२-५०४
९. अप्पासाहेब पवार ,पूर्वोक्त पृ. ४,६, ७
१०. कित्ता, पृ. ९
११. ज.द.अंभ्यकर, पूर्वोक्त पृ. २९१.
१३ श्री. योगेश आणि सिताराम अभ्यंकर याची दि. ३०/०८/२०२० घेतलेल्या मुलाखतीनुसार