स्मारके

मौजे जांभूळपाडा येथील सरदार बाजी गोविंद जोशी यांची समाधी- एक अभ्यास

लेखक :  श्री. संदिप मुकुंद परब

प्रस्तावना :-

            पाली खोपोली या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच जांभूळपाडा हा गाव आहे. या गावाच्या स्मशानभूमीशेजारी असलेल्या पंपहाऊसला लागूनच पेशव्यांचे सरदार जोशी घराण्यातील बाजी गोविंद जोशी यांची समाधी आहे. सदर समाधीही आजही सुस्थितीत असून सदर समाधीपासून अंदाजे ६०० मी. च्या अंतरावरच जोशी घराण्याचे वास्तव्य असलेला पुरातन वाडा आहे. आजही सदर वाड्याच्या देखभालीकरिता सरदार बाजी गोविंद जोशी यांचे वंशज येथे येत असतात. या घराण्याला इनाम दिलेलीजमीन कुंभारशेत या गावात असून सद्यःस्थितीतही काही जमीन त्यांच्या वंशजाच्या नावे आहे. उपरोक्त समाधीची ओळख ऐतिहासिक साधनाच्या माध्यमातून करून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न होय.

.        जोशी घराण्यासंदर्भातील माहिती वंशावळ :-

            या घराण्याच्या मूळ पुरुषाचे नाव गोविंद जोशी असून ते मौजे जांभूळपाडा येथे वास्तव्यास होते. त्यांना रामचंद्र, बाजी व बाळ अशी तीन अपत्ये होती. त्यापैकी बाजी हे अत्यंत धाडसी व पराक्रमी होते. याच त्यांच्या गुणांवर खूश होऊन थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांना पुण्यास आपल्या पदरी ठेवून सरदारकी दिली. पुढे पेशवाईत त्यांनी तलवार गाजवून बराच नाव लौकिकही मिळविला. सुधागड तालुक्यात हवालदार जोशी या नावाने हे घराणे आजही प्रसिद्ध आहे. सदर घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणे आहे.

.        सरदार बाजी गोविंद जोशी यांनी केलेल्या पराक्रमासंदर्भातील ऐतिहासिक माहिती :-

अ.       जंजिरेकर सिद्धीवरील मोहीमः

बाजी गोविंद जोशी हे थोरल्या बाजीराव पेशव्याच्या सैन्यात सरदार या पदावर कार्यरत होते. छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेवरून इ.स.१७३३ ते १७३७ पर्यंत पेशव्यांच्या एकसारख्या स्वाऱ्या सिद्दीवर सुरू होत्या. यावेळी राजपुरी हे महत्त्वाचे बंदर असून सिद्दी आपली सर्व सत्ता याच बंदरातून नियंत्रित करीत होता.  या मोहिमेत सरदार बाजी गोविंद जोशी यांनीही सहभाग घेतला होता. या मोहिमेवर ते पुण्याहून आंबेनळी घाटातून चालले असता आसरे या गावी श्रीविरेश्वरच्या देवालयासमोर त्यांच्या सैन्याचा तळ पडला होता. तेव्हा त्यांनी श्रीविरेश्वराला  नमस्कार करून सदर मोहीम फत्ते झाल्यास देवालयाची नूतन इमारत बांधू अशी इच्छा प्रकट केली. या मोहिमेत पेशव्यांकडून झालेल्या आक्रमणाच्या भीतीने सिद्दीने आपली राजपुरी येथील राजधानी सोडून किल्ल्यात गेला व पेशव्यांशी तह केला. मोहिमेतील या यशाने आनंदित होऊन सरदार बाजी गोविंद जोशी यांनी इ.स.१७३५ साली श्रीविरेश्वरच्या देवालयाचे बांधकाम करून घेतले व देवालयासमोर प्रशस्त तलावही खोदला.

ब.        कर्नाटक मोहीम :-

बदामी किल्ला व त्या सभोवतालचा परिसर विजयनगरच्या ताब्यात दोनशे वर्षे राहिल्यानंतर त्याचा ताबा इस्माईल आदिलशहाकडे गेला. विजापूरची आदिलशाही बुडाल्यानंतर सावनूरचा नबाब या किल्ल्याचा व सभोवतालच्या प्रांताचा उपभोग घेऊ लागला. इ.स. १७४६ मध्ये सदाशिवरावभाऊंनी नबाबाशी तह करून या किल्ल्याचा तसेच सभोवतालच्या प्रांताचे स्वामित्व पेशव्यांकडे मिळविले. इ.स.१७७८ मध्ये हैदर अल्लीने बदामीचा किल्ला व सभोवतालचा प्रदेश बळकावला म्हणून नाना फडणीसांनी चार आठवडे संस्मरणीय वेढा घालून पुन्हा हा भाग इ.स.१७८६ मध्ये मराठ्याच्या ताब्यात आणला.उपरोक्त बदामी किल्ला सर करण्याच्या मोहिमेत सरदार बाजी गोविंद जोशी यांचा सहभाग असल्यासंदर्भातील माहिती श्रीविरेश्वर देवालयाच्या प्रागंणातील फलकावर नमूद असून सदरचा उल्लेख चित्पावन या नारायण चाफेकर यांच्या ग्रंथातही आलेला आहे.सरदार बाजी गोविंद जोशी यांचे कर्नाटकांतील हैदर नायकावरील पेशव्यांच्या मोहिमेत सक्रिय सहभाग असल्यासंदर्भातील ऐतिहासिक साधनातील पत्रव्यवहार पुढीलप्रमाणे आहे.

क्रमांक :

पत्र क्रमांक : ६४

पत्र दिनांक : २६/०४/१७६५

पो १७ जिलकाद खमस वैशाख

श्री

            सेवेसी बाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत छ ५ जिलकादपावेतो मुकाम नजोक सोंडूर पाले वर्तमान येथास्थित असे विशेप आज्ञापत्र पाठविले तेथे आज्ञा की, वराडचे मजमुविशी श्रीमंतांस पत्र पाठविले आहे, देऊन उत्तर घेऊन पाठवणे. त्यावरून पत्र दिल्यावर कारभारी यास बोलाऊन आणून रागे भरले. गैरवाका समजावून पत्र कोणी दिल्हे . कारभारी, पहिले आपणांस ठावके नाही, म्हणत होते, मग देण्याची याद चिटणिसाकडून आणविली. ती राजश्री चितोपंतांनीच मखलाशी लिहिली आहे, तेव्हा वेगळे वाटेने रागे भरोन ताकीद करून लवकर ताकीदपत्रे देविली, ती ताकीदपत्रे व पत्राचे उत्तर पाठविले आहे. आपले आसामीची त्यास फारच गोष्ट लागली की आपण नानाकडे आसामी करार करून दिली. नानाचे अगत्य आपणांस पुर्तें. माझी ममता नानाचे जागां फार हे ठावके असोन गैरवांकां आमचे कानावर न घालिता मखलाशी करून दिली. याप्रमाणे येका दोघाजवळ भाषण केले. सदाशिवपंताचे पत्रावर आपले स्वदस्तुरे दाहा ओळी लिहिल्या आहेत.  आपले विशी राजश्री हरिपंत भिडे फारच श्रीमंतांची खातरदास्त करीत असतात. कळावे. श्रीमंत मोरोबादादा श्रीमंतांचा निरोप घेऊन आजच कोल्हापुरास, तेथून पुलेयाचे गणपतीस, तिकडूनच पुणेयास येतील. इकडील कामकाजाचा गुंता फार करून उरकला. याजउपर दरमजल कूच करून दरमजल ज्येष्ठ शुद्धांत पुणेयास येतील. थोरले श्रीमंत आठ दहा दिवस पुण्यात राहून मग चावढसेस जाणार असा विचार आहे. घडेल ते खरे. फौजेस सालमजकुरी नालबंदीस पैसा नाही. हैदरनाइकाकडील पुढील हप्त्याचे चवदा, त्यापैकी पांच लक्ष रुपये तूर्त सावकारापासून व्याज कापून घ्यावे व काही खाजगीकडून पांच लक्ष पावेतोकर्ज घ्यावें व सावकारांपासून पांचपावेतो कर्ज घेऊन पंधरा लक्षांवर फौजेची रवानगी करावी याप्रमाणे मजकूर पडल्या घोड्यांचा वगैरे अजमास पाहाता, दोन्ही स्वाऱ्यांचे फौजेस पंचवीस लक्ष रूपये असावे, त्यांत ऐवज सदर्हूप्रमाणे दिसतो. सेवेसी कळावे. घोरपडे यांजकडे बारा हजार रूपये नजरेचा ऐवज करार केला तो पुण्याचे खर्चास द्यावयाविशी श्रीमंत रावसाहेबांस विनंती केली आहे. तूर्त आम्ही श्रीमंती दादासाहेब श्रीकार्तिकस्वामीजवळ राहिले आहेत, यांजवळ आपण आहो श्रीमंत रावसाहेब पुढे बल्हारीकडे गेले दोहोचोहो दिवशी गांठ पडल्यावर कागद पत्र घेऊन पाठवितो. राजश्री गोपाळराव व रास्ते विसाजी नारायण यांस छावणीस राहा म्हणतात; अद्याप त्यांचे बोलणे चालणे विल्हेस लागले नाही. बेळापूरचा किल्ला गोपाळरायास दिल्ह्याखेरीज छावणीस राहात नाही. थोरल्या श्रीमंतांचे विचारे तूर्त किल्ला सरकारांत ठेवावा ऐसे मानस आहे; ठरेल ते खरे सेवेसी श्रुत हे विज्ञापना.

क्रमांक :

पत्र क्रमांक : ५९

पत्र दिनांक : २८/०२/१७६५

पो २७ रमजान सन खमस

फाल्गुन हा धोंडजी संभाजी

जासूद जथे सखाजी सितोला.

श्री

            सेवेसी बाजी गोविंद कृतानेक सां ना विा ता छ ७ रमजानपावोतो मुा नजीक कुमसी प्रां बिदरूर वर्तमान यथास्तित असे विशेष. अलिकडे पत्र येऊन वर्तमान कलत नाही तर सविस्तर ल्याहावयासी आज्ञा केली पाहिजे. इकडील वर्तमान तर श्रीमंत हैदर नाइकाचा तह तीस लक्ष रूपयावर होत होता, परंतु हैदराने आइकिले नाही. तेव्हा बिदरूरास जावे, ठाणे घ्यावे, हैदर नाईकाचे पारपत्य करावे, यैसी पकी मसलत करून झाडीत सिरले. हरनहलीचे ठाणे गोली न वाजविता घेतले. कुमसीचे ठाणे तीन दिवस जुजले. छ मजकुरी सरकारचे निशान घेतात. सल्यास आले. या उपर अनंतपूर येथून साहा कोस आहे, तेथे मीर फैजुल्लाखान च्यार हजार फौज, च्यार हजार गाडदी, पैसे होता तो कालच निघोन पलीकडे दाहा कोसावर किल्ला आहे तिथे गेला. हैदर नाईक खासा बिदरूरास आहे. उदईक कूच होऊन अनंतपुरात जाणार. ते ठाणे घेतल्यावर बिदरूरास जाऊन तेथील ठाणे घालणार. तेव्हा हैदर ना अनंतपुरास खासा स्वारी गेल्यावर तेथे राहात नाही. येकादा किल्ला बलकावुन बसणार. श्रीमंताची फतेच दिसते. सारांश तो चोर लहान माणूस, पुरती जरब बसल्याविना सला करत नाही. वरकड लस्करचे वर्तमान तर खर्चाची तंगचाई मोठी. कोठे कर्ज देखील मिळत नाही. दरमहा पाच लक्ष रूपये खर्चात लागतात. पैसा कोठून येत नाही. हरपनहली चित्रदुर्गचे खंडणीचा ऐवज आला तो खर्च होऊन गेला. बिदरूर प्रांतीची हवा फारच वाईट.फौजेस विसा पंचविसा दिवशी रोजगार देतात. लोकात काही हाल राहिले नाही. याउपर होईल वर्तमान ते मागाहून लेहून पाठवीन. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

क्रमांक :

पत्र क्रमांक : २२७

पत्र दिनांक : १२/०४/१७७१

पो २७ मोहरम इहिदे.

श्री

            सेवेसी बाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत छ २६ जिल्हेजपावेतों मुकाम नजीक श्रीरंगपट्टण वर्तमान येथास्थित असे विशेष. येथील वर्तमान तर हैदर नाइकाचा मोड होऊन पटणास येऊन तोफा सुरू करून गोळ्यांची मारगिरी दुतर्फी होत आहे, व हैदर नाइकाचे सल्ल्याचे राजकारण राजश्री सेनापती याचे विद्यमाने मुरलीदासाचा भाऊ रघुनाथदास बोलावयासी येणार होता. त्यास सेनापतीचे हातून सल्ला करावयाचा नाही, येविशीचे तपशील तोफखान्यांकडील सांडणीस्वाराबराबर लिहून पाठविलेच होते त्यावरून कळलेच असेल. त्यावर आज पंचवीस दिवस नित्य दुतर्फा तोफांची मारगिरी होतच आहे. हल्ली हैदर नाइकाकडील वकील राजश्री शामराव गोपाळ नरसीपूरकर राजश्री आनंदराव रास्ते यांचे विद्यमाने सलुखाचा प्रकार बोलावयासी आला. हैदर नाइकाचे हलाखीचा प्रकार, सर्व जिनगानी लुटली गेली, आता काही हाल राहिला नाही. कृपा करून रयातच कराल तर तीन साला खंडणीपैकी येक साला पायेमल्ली मजरा द्यावी, बाकी सोडावी; आणि दुसाला अठ्ठावीस लक्ष घ्यावे. मदगिरी चेनरायदुर्ग सोडावे व नवा मुलुख घेतला आहे तो सोडावा, याप्रमाणे बोलो लागल्यावर रास्ते यांणी फारच निषेध केला. हे लबाडीचे बोलणे तुम्हास बोलावयाचे असेल तरी आमचे विद्यमाने बोलो नये. परभारे हरकोणाचे हाते बोलावे. आमचे विद्यमाने बोलत असाल तर आमचे तीन साला खंडणी व दरबारखर्च व मागील बाकीचे दाहा व पाळेगारापासून वसूल पंधरा घेतले आहेत ऐसे सत्तर होतात. वाजवी कराराप्रमाणे पैका पुण्यास पावता न केला. दोन साले सारीच फौज ह्याच मसलतीस गुंतली त्याचा खर्च दोनक्रोडी जाहाला. ऐसा पैका मातबर होतो, त्यास तुमचे विच्यारे निदान मामलतच करावी असे असल्यास निदान येक क्रोड रूपये व सोंधे बिदनूर सोडावे. याजखेरीज पालेगाराचा व सरकारचा मुलुख तुम्ही घेतला आहे तो सोडावा. फक्त पट्टण मात्र तुम्हांकडे ठेवावे. राजेयाचे आज्ञेप्रमाणे वर्तणूक करावी. पेस्तर सालापासून खंडणी करार होईल त्याप्रमाणे फौज या प्रांती न येता पैका पुण्यास पावता करावा. ऐसे साफच सांगोन वकिलास पाठविले;  आणि सर्वांचे विचारे आज दोन वर्षे फौज खराब जाहाली, पुढे छावणी केल्यास हुजरातचे फौजेस कार्तिक मासपावतो पंनास लक्ष रूपये, याखेरीज सरंजामियांतहि हाल राहिला नाही, त्यास सत्तर पंचाहत्तर लक्षपावेतो व कोल्हार व चिकबाळापूर सोडो नये; याप्रमाणे सर्व जाहल्यास तह करावा; ऐसा सर्वांनी विचार केला. त्यास वकील गावांत जाऊन पहिल्यांने बोलिलो त्याप्रमाणे कबूल होत असल्यास फिरोन येतो, नाही तरी राहुटी व उंट आहेत ते पाठवून द्यावे. त्यावरून कबूल होत नाही. उंट राहुटी गावांत वकिलाची पाठविली. निदान पंनास लक्षपावेतो विल्हेस लावावे. हे हैदर नाइकाचे मानस. येथील तो वर लिहिल्याप्रमाणे जाहाले तरी करावे, नाही तरी छावणीच करावी, हा डौल. या तलावर वैरण अगदी मिळत नाही. दाणा दोन पायली मिळत होता तोहि आता फारसा मिळत नाही. रोज लोकांची थोडी थकोन राहातात. च्यार दिवस आणखी वाट पाहाणार. काही तळ्यावर येऊन बोलो लागल्यास उत्तमच जाहाले; नाही तरी चित्रदुर्गकरहि छ २४ जिल्हेजी येऊन भेटले, हजार स्वार पांच हजार प्यादा समागमे आहे, त्यांचे व सर्वाचे विचारे बिदनुराकडे अगर घांटाखाली जावे. कोणते ठरणे ते याच तळावरून ठरल्यावर मागाहून लेहून पाठवितो. हैदर नाइकाचे तोंडावर दाहा हजार फौज वीस कोंशी ठेऊन वरकड फौज सुद्धा वैशाख शुध्द् द्वितीयेस कूच करून कडुरबाणावरचे वाटेने बिदरूराकडे जावे हा ठराव जाहाला आहे. कळावे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.१०

क्रमांक : ४  

पत्र क्रमांक : २२८

पत्र दिनांक : १५/०५/१७७१

पौ २९ सफर इहिदे

श्री

श्रीमंतर राजश्री  नाना स्वामीचे सेवेसी

            विनंती सेवक बाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत छ २९ मोहरमपावेतो मुकाम कैरव संमत रायदुर्ग वर्तमान येथास्थित असे विशेष. श्रीमंतांनी या प्रांती फौज छावणीस राजश्री त्रिंबकराव मामा याजवळ ठेऊन आपण देशी गेले. फौजेचे बेगमीस ऐवज देविला तो अद्याप येऊन पोहोचला नाही. लोकांचा गवगवाच आहे. धारणहि माहागच आहे. प्रस्तुत श्रीमंत देशी गेले. छावणीची फौज पट्टणचे मुलकाचा शह सोडून अलिकडे आल्यामुळे हैदरखानाची फौज थोरले बाळापुराजवळ व हगलवाडीजवळ जमा जाहाली आहे. ठाण्यांत पोख्क्ती शिबंदी नाही. हगलवाडीहून कोठेंहि ठाणी दगा करून घ्यावी. हे त्यांचे मानस आहे. याउपर कूच करून त्याच रोखे जाऊन ठाण्याचा बंदोबस्त करतील. तूर्त मोठा पेच वैरणीचाच आहे, यामुळे येकदा फिरल्या मुलकांत फौज गेल्याने घोड्यांत हाल राहणार नाही. कळावे प्रस्तुत मामा राजश्री मुरारराव व गोपाळराव यांचे विचारेच सल्ला मसलत करणे तो करितात. उभयेतां येथे येत असतात. सर्वांचे येक चिंत्तच आहे. धन्याचे कार्यास काम पडल्यावर मन वाढविण्याविशी कोणी मागे घेणार नाहीत.धन्याचे पुण्यप्रतापे सर्व येथास्थितच होईल. कळावे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.११

तसेच कर्नाटकात सैनिक पाठवण्यासंदर्भातील सन १७९०-९१ मधील‘‘कर्नाटकांत स्वारीस पाठविण्याबद्दल नेमणुकीपैकी लोक आणविले असते, तरी चांगले लोक बंर्कदाज दरमहा खर्चाची बेगमी करून जलद हुजूर पाठवून देणे. म्हणोन.

सनद

१.        “गोविंदराव बाजी यांस तालूके सरसगड पैकी असामी ५० पन्नास येविशी” १२

या नोंदीतील गोविंदराव बाजी हा जो उल्लेख आहे. तो बाजी गोविंद यांच्या पुत्राचा असून सदर नोंदीवरून असे स्पष्ट होते कि सरदार बाजी गोविंद जोशी यांनी तसेच त्यांचे पुत्र गोविंदराव बाजी यांनी कर्नाटकातील मुलुख जिंकणे कामी पेशव्यांनी केलेल्या मोहिमात सहभाग घेतला होता.

.        सरदार बाजी गोविंद जोशी यांना मिळालेल्या इनाम गावासंदर्भातील माहिती :-

            (शांडिल्य) जोशीकुलवृत्तांतात हवालदार जोशी घराण्यातील ८ व्या पिढीतील निलकंठ सदाशिव जोशी यांनी दिलेल्या माहितीवरून सरदार बाजी गोविंद जोशी यांनी केलेल्या पेशवाईतील कामगिरीबद्दल कुंभारशेत व अघोर अशी दोन गावे इनाम दिली होती. त्यांच्या मते सदर इनामासंदर्भातील पेशवेकालीन व ब्रिटिशराजवटीतील सनदा .अच्युत वामन जोशी यांच्याजवळ आहेत.१३  मौजे कुंभारशेत या गावी या घराण्यातील श्रीकांत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याजवळ ४०० एकर जमीन होती. त्यापैकी बरिचशी जमीन कुळकायद्याअंतर्गत कुळाकडे गेली. पैकी थोडीफार जमीनआजही त्यांच्या वंशजांच्या नावे आहे. त्यापैकी काही वंशजाच्या नावे असलेल्या जमिनीचे ८अ पुढे देत आहोत.

४.        बाजी गोविंद यांनी सावंतवाडी संस्थानातील हेटकरी पथक स्वखर्चाने तयार केल्याची माहिती :-

१.        सवाई माधवराव पेशवे रोजनिशीतील दादासाहेब उर्फे रघुनाथराव यांच्या किर्दी पैकी सन १७७९-८० मधील नोंद

            नवाब इैदर अल्लीखान बहादूर यांचे नावे पत्र की, तुझ्याकडील सरकारात खंडणीच्या ऐवज पैकी भरणा

४०००००

            २००००० मार्फत भुकनजी देव सावकार       रूपये

                        १००००० किता हुंडी

                        १००००० किता हुंडी

                        ––––––––

                        २०००००

                        इंग्रजी जहाजावरी पाठविले

                        १००००० किता

                        १००००० किता

                        ––––––

    ४०००००                 २०००००

            सदरच्या पावत्या अलहिदा दिल्या असेत.

९९४९१२ गुजारत बाजीराव गोविंद

                        ७७०००० कित्ता

                        २९४९५२ मशारनिल्हेच्या खर्चाबद्दल

                        ––––––

                        ९९४९५२१४

२.        सवाई माधवराव पेशवे रोजनिशीतील दादासाहेब उर्फे रघुनाथराव यांच्या रोजनिशी पैकी सन १७७९-८० मधील नोंद

“बाजीराव गोविंद याचे नावे पत्र की, तुम्ही विनंतीपत्र पाठविले ते प्रविष्ठ जहाले. आशा होईल तरी इकडे फौजेची जथ धरितां, त्यास विजापूर प्रांताची, व रास्ते, व मिरजकर याजकडील महालाचे जपतीच्या सनदा पाठवाव्या व नवाब हैदर अलिखान बहादूर व व्यंकटापा नाईकाची सनद व रास्ते, व मिरजकर यांचे महालाची सनद एकूण दोन सनदा सादर केल्या आहेत, तरी तुम्ही त्या मुलकाची जप्ती करून फौजेची जथ पडेल तो पाडून खास स्वारी मोहिमेस बाहेर निघेल ते सभई तुम्हास हुजूर यावयाची आज्ञा केली जाईल तेव्हा येणे. तुमचे साहित्यविशी नवाबास लिहिले आहे, व व्यंकरपा नाईक वगैरे यासही अलाहिदा पत्रे सादर केली असेत म्हणोन, मशारनिल्हेचे नावे चिटणिस जमीनदार प्रांत विजापूर यांचे नावे पत्र की, प्रांत मजकूर येथील सरकार अमलाचे जपतीची आज्ञा नरसिंगराव गोविंद यास केली आहे, तरी तुम्ही मशारनिल्हेसी रूजू राहोन अंमल सुरळीत देणे म्हणोन.

            जमीनदार महालनिहाय निसबत रास्ते, व मिरजकर याचे नावे पत्र की, महालानिहाय येथील जप्तीची आज्ञा नरसिंगराव गोंविद यांस केली आहे, तरी तुम्ही मशारनिल्हे यांस रूजू राहोन अंमल सुरळीत देणे म्हणोन.’’१५

            उपरोक्त दोन्ही नोंदीचा आधार घेतला असता सरदार बाजी गोंविद जोशी हे रघुनाथराव उर्फ दादासाहेब यांच्या पदरी कार्यरत असल्याचे सिद्ध होते. पेशवे नारायणरावाच्या खुनानंतर रघुनाथराव यांच्या पक्षात तसेच त्यांच्याबरोबर कार्यरत अशा बऱ्याच सरदाराची इनामे बारभाईनी जप्त केली. त्यावेळेस बहुधा सरदार बाजी गोविंद जोशी यांचीही जहागीर जप्त केली असावी.पुढील काळात पेशवाई सावरेल या आशेने त्यांनी सावंतवाडी संस्थानातील हेटकरी लोकांचे पथक पदर खर्चाने तयार करुन आपल्या पदरी ठेवले.१६(हेटकरी- महाराष्ट्र शब्दकोशकाराच्या मते सह्याद्री खाली (पÍिचमेस)असलेला कोकण देश म्हणजे हेट देश असून तेथील रहिवाशी ते हेटकरी होत.

            कोकणातील रहिवाशांनीसुद्धाहेट शब्दाचा म्हणजेच हेट देश प्रांताचा आणखी संकोच करून ठाणे – कोकणातील लोकांनी सावित्रीनदीच्या दक्षिणेकडील कोकणास हेट प्रांत असे नाव दिले. तर या सावित्री नदीच्या फक्त मालवण तालुक्यास हेट हे नाव ठेवले. आजही कोकणात हेट म्हणजे दक्षिण दिशा.हेटकरी हे दर्यालढाऊ असल्याने गौतमापासून ते मौर्य, चालुक्य, सातवाहन, कदंबापासून ते पेशवाईच्या अखेरपर्यंतच्या काळात ते आरमारी शास्रात प्रवीण बनले. स्वराज्यात या लोकांचा भरणा आरमाराप्रमाणे पायदळातही बरकंदाज या नावाने होई.१७)

            आज जांभूळपाड्यात शिर्के, दळवी, भोसले, ही जी काही मराठी घराणी आढळतात ती याच पथकातील सैनिकाच्या वंशजापैकी आहेत.

.        सरदार बाजी गोविंद जोशी यांच्या संदर्भातील ऐतिहासिक साधनातील नोंदी:-

१.        सन १७६३ ते १७६५ पुणे दप्तरातील कारकून यांनी खरेदी केलेल्या तांदुळाच्या यादीत बाजी गोविंद जोशी यांची नोंद.”कारकून निसबत दप्तर यांचे तांदूळ खरेदी फिरगांण कोकणातून हरएक जागाहून खरेदी करून एक खेप पुण्यास आणितील त्यास आणू देणे जकातीचा तगादा न करणे म्हणोन सालगुदस्तप्रमाणे साल मजकुरी दस्तके”१८

२.        सन १७७७ ते १७७८ चिमणाजी महादेव व महादेवराव राम यांच्या कसबे पाली येथील हटाळे तलावाच्या मालकी संदर्भात सरदार बाजी गोविंद जोशी यांना सनद१९

३.        सन ……… पेशव्यांकडून त्यांच्या सरदारास देण्यात येणाऱ्या वेतन तसेच इतर भत्त्यासंदर्भातील पुणे दप्तरांच्या यादीतील बाजी गोविंद जोशी यांची नोंद२०

४.        सन १७९४:-  गोविंदराव काळे यांच्या दप्तरातील बाजी गोविंद जोशी यांची शेवटची नोंद पुढीलप्रमाणे आहे.

 “हुजरात घोडी अजमासे दहा हजार १०००० यांचे सरदार

१.                   अवदूत सोनवंशी;, बाजीराव गोविंद”२१

५.        श्री महेश तेडुलकर यांनी आपल्या बंच ट्रेकिंग -३, सुरगड-सरसगड-सुधागड-ठाणाळे लेणी या ग्रंथात बाजी गोविंद यांच्या संदर्भांत केलेला उल्लेख पुढील प्रमाणे आहे. सवाई माधवराव यांच्या कारकिर्दीत सरसगडचा उपयोग कैदखान्यासारख्या करीत असत त्यावेळी बाजीगोविंदहे मामले आमीनाबादचे मुख्याधिकारी किंवा मामलेदार होते आणि नाना फडणीसांकडून त्यांना गुन्हेगांराना कोणकोणत्या शिक्षा द्यायच्या यासंबंधी सनदांद्वारे सूचना येत असत. त्यापैकी काही सनदा खालील प्रमाणे आहेत

.  

दि. २६ मार्च १७७८

शके १६९९ फाल्गुन वद्य १३

नरसिंगराव गोविंद किल्ले पाली येथे अटकेस आहे त्याची मातुश्री पुणियांत होती ते मृत्यू पावली तिची क्रिया करण्याबद्दल ब्राह्मण तेथे अस्थी घेऊन येईल. अस्थी आलियावर नरसिंगराव यांचे पायांतील बेडी काढून चौकी चांगली बंदोबस्ताने ठेऊन क्रियेस ब्राह्मण मेळऊन वीस रूपयेपर्यंत क्रिया करण्यासी देऊन क्रिया करवणे. क्रिया जाहलीयावर पूर्ववतप्रमाणे बेडी घालून ठेवणे म्हणोन.

ब.       

दि. २७ मार्च १७७९

शके १७०१ चैत्र शुद्ध १०

            संतू पवार कोळ्याचे मळईत (मसलतीत) होता सबब किले पोरगड (पालीगड ?) तालूके सरसगड येथे अटकेस ठेवीला आहे त्यास दादजी लांडगा व मोराजी झुऱ्या खिजमतगार दिंमत तानाजी पडवळ यांस पाठविले आहेत. यांचे गुजारतीने पवार मजकुराचे डोके मारून हुजूर लेहून पाठविणे.

क.  

दि. १२ जून १७८२

शके १७०४ ज्येष्ठ शुद्ध

            कृष्णाजी उतेकर यांने कृष्णाजी महाडीक शिंपी वस्ती कसबे पाली यांच्या कुणबिणी दोन मौजे रतबगाव या तर्फ पाल हवेली येथील नदीवर जिवे मारून आपण महाडास घरी गेला त्याचा पत्ता तुम्ही लावून धरून आणून किल्ले सरसगड येथे अटकेस ठेवीला आहे त्यास हल्ली तोफेचे तोंडी द्यावयाची आज्ञा केली असे तरी तोफेच्या तोंडी देऊन उडवून टाकणे.

ड.                                                                                           

दि. २९ जून १७९४

शके १७१६ आषाढ शुद्ध २.

             काशी कोम त्रिंबकजी चवाण कसबे नेवासे इणे दादला (नवरा ) व घरदार सोडून पुण्यात येऊन बदकर्म करीत होती सबब किल्ले सरसगड येथे अटकेत ठेवण्यास बरोबर गाडदी निसबत राघो विÍवनाथ याजकडील देऊन पाठविली असे तरी किल्ले मजुकरी कैदेत ठेवले तेथे कोणाशी बदकर्म करू नये व कोणी निसबतीस घेऊन आपले घरी नेऊन कामकाज करू नये किल्ले मजकूरचे इमारतीचे वगैरे काम घेऊन पोटास शेर शिरस्तेप्रमाणे देत जाणे.

.        बाजी गोविंद यांचे सुपुत्र गोविंदराव यांच्या ऐतिहासिक साधनातील नोंदी

१.        सन १७८७-१७८८ पेशवे सवाई माधवराव यांना दसऱ्याच्या सणावेळी सरदारांनी अर्पण केलेल्या नजराण्याच्या यादीतील नोंद.

“कमावीसभेत राजश्री राव यास, विजयादशमीस ८ मोहरमी सीमा उल्लंघन करून स्वारी वाड्यात आल्यावर सदरेस लोकांनी नजरा केल्या ते जमा

            ६२३॥ मोहरा नाणे

१.    गोविंदराव बाजी जोशी”२२

२.        सन १७८८-८९ पुणे दप्तरातील कारकून यांनी कोकणातून खरेदी केलेल्या तांदळावरील जकात माफीच्या यादीत गोविंदराव बाजी यांची नोंद

“कारकून निसबत दप्तर यांचे तांदूळ वगैरे जिन्नस खेरिज फिरंगाण कोकणातून हरएक घाटे व गल्ला देशातून खरेदी करून एक खेप पुण्यास आणतील त्यास आणू देणे. जकातीचा तगादा न करणे म्हणोन सालगुदस्ताप्रमाणे साल मजकुरी  दस्तके”२३

३.        सन १७८९-९० मधील कायस्थ प्रभू समाजाने पेशवे नारायणराव यास लिहून दिलेल्या कतब्याप्रमाणे पालन करत नसल्यासंदर्भातील निवेदन पेणकर ब्राह्मणानी पेशवे सरकार यास दिले होते. त्यास अनुसरून पेशव्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संबंधित कायस्थप्रभू समाजातील लोकांनी सदर कतब्यातील कलमानुसार वतर्णूक करावी अन्यथा त्याचे पारिपत्य करून त्याच्या जवळून गुन्हेगारी घेत जाणे. अशाप्रकारच्या आदेशासंदर्भातील पत्रे पेशव्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना पाठविली होती. त्या यादीत गोविंदराव जोशी यांची नोंद पुढीलप्रमाणे आहे.२४

४.        सन १७९३-९४ नेरे गावच्या वसूला संदर्भांतील नोंद पुढीलप्रमाणे आहे.

     “महालाच्या कमाविसदार यांस की, वसूल त्याजकडे जाऊन न देणे रयतेकडून ऐवज येणे तो वसूल तुम्ही घेऊन अमानत जमा करून ठेवणे यासंदर्भातील सनद.

१    गोविंदराव बाजी यांस की, मौजे नेर मामले पाल, हवेली पैकी जमीन सरकारांतून संरजामास दिली आहे येविशी सनद.’’२५

.        सरदार बाजी गोविंद जोशी यांच्या वंशजांच्या ताब्यात असलेला वाडा :-

सरदार बाजी गोविंद जोशी यांचे वंशज राहत असलेल्या जांभूळपाडा येथील वाडा सद्यःपरिस्थितीतदुरवस्थेत आहे. सदरच्या वाड्यात पितळी पाईपने विहिरिचे पाणीवाड्यातील इतर भागात पोहचविण्याची सोय होती सद्यः परिस्थितीत सदर वाड्याची मालकी अनिल शंकर जोशी व यशवंत भास्कर जोशी यांच्या नावे असून सदरचे असेसमेंट पुढीलप्रमाणे आहे. सदर वाड्याची दुरवस्था झाल्याने मुख्य भागावरील प्रवेशद्वार चांगल्या परिस्थित असून त्याचे छायाचित्र पुढीलप्रमाणे आहे.

बाजी गोविंद यांच्या वाड्याची मालकी त्यांचे वंशज अनिल जोशी व यशवंत भास्कर जोशी यांच्या नावे असलेले असेसमेंट

.        समाधी :-

प्राप्ती स्थळ :जांभूळपाडा या गावाच्या स्मशानभूमीला लागून असलेल्या पंपहाऊसशेजारी.

वर्णन :सदर समाधीची घडण ही अगदीच साध्या स्वरूपाची असून समाधीच्या मध्यभागी महिरप कोरून त्यात हातात तलवार घेतलेल्या वीराचे चित्र कोरलेले आहे. सदर महिरिपीवर तीन पानाच्या नक्षीचे साधे अलंकरण केलेले असून समाधीच्या वरील तसेच खालीलबाजूस चारही बाजूंनी नक्षीकाम केलेले आहे.

कालनिर्देश : सन १७०० ते १८००

समाधी लेख : नाही.

मोजमाप :

मौजे जांभूळपाडा येथे सरदार बाजी गोविंद जोशी यांची समाधी सुस्थितीत आहे सदर समाधीवरील गोलाकार भाग हा मुळात छत्रीचा प्रकार असून त्यावर मोगल व राजस्थानी स्थापत्याचा प्रभाव असल्याचे स्पष्ट होते पुढील कालखंडात कलाकुसर नक्षीकाम करणारे कारागीर दुर्मीळ झाल्याने साद्य अलंकरण हे या गोलाकार भाग कोरण्यामागील खरे कारण होय. सदरचा भाग हा १७०० नंतरच्या कालखंडातील समाध्यामध्ये जास्त आढळतो. उपरोक्त समाधीही सन १७०० ते १८०० मधील समाध्याचा कालखंड दर्शविते   अशा प्रकारच्या समाध्या ह्या कोकण किनारपट्टी लगत मोठ्या प्रमाणात आढळत असून सदर समाध्याची पद्धत ही कोकणात आंग्रे काळाच्या उदयानंतर प्रसारित झाली. अशा प्रकारच्या बऱ्याच समाध्या सुधागड, रसाळगड या किल्ल्यावरती सापडतात.२६

निष्कर्ष :-

मौजे जांभूळपाडा येथील जोशी घराण्यातील बाजी गोविंद जोशी हे पेशवाईत सरदार म्हणून १७३३ पासून १७९३ पर्यंत कार्यरत असल्याचे उपरोक्त नोंदीवरून सिद्ध होते. तसेच त्यांचा मृत्यूही १७९३ नंतरच झाला असावा. असे मानण्यास काहीही हरकत नाही. या घराण्यास हवालदार हे पद सरदार बाजी गोविंद जोशी यांनी केलेल्या सिद्धीवरील व कर्नाटकातील मोहिमेदरम्यानच मिळाले असावे. सरदार बाजी गोविंद यांचा पुण्यालाही वाडा होता. तो बंडूनाना रानडे यांस विकला तसेच त्यांची नातू यांच्या घराजवळ घोड्याची पागाही होती. अशा प्रकारे बाजी गोविंद जोशी यांचे वास्तव्य पुणे व जांभूळपाडा येथे होते. परंतु कालांतराने पुण्यातील वाडा विकल्याने त्याचे व त्यांच्या वंशजाचे पुढील वास्तव्य हे जांभूळपाडा येथीलच त्यांच्या मूळ वाड्यातच होते असे दिसते.

            जांभूळपाडा येथील समाधीचा कालखंड पाहिला असता सरदार बाजी गोविंद जोशी यांच्या कारकिर्दीशी जुळत असून पेशवाईत मौजे जांभूळपाडा येथे वास्तव्यास असलेल्या घराण्यापैकी जोशी यांचेच घराणे पेशवाईत मोठ्या हुद्दयावर कार्यरत होते. तसेच सरदार बाजी गोविंद जोशी यांचे पुत्र गोविंदबाजी हेही पेशवाईत कमाविसदार या पदावर कार्यरत असल्याचे उपरोक्त नोंदीवरून सिद्ध होते व त्यांनीच आपल्या वडिलांची समाधी मौजे जांभूळपाडा येथे बांधली. अशाप्रकारेसरदार बाजी गोविंद जोशी यांना मिळालेली इनाम जमीन, त्यांच्या वंशजांचे  जांभूळपाडा येथील वास्तव्य, पेशवाईतील त्यांच्या कार्यरत असण्यासंदर्भातील ऐfितहासिक साधनातील नोंदी व महेश तेंडुलकर यांच्या बंच ट्रेकिंग-३, सुरगड-सरसगड-सुधागड-ठाणाळे लेणी या ग्रंथात उल्लेखिलेल्या सरदार बाजी गोविंद जोशी व सुधागड तालुक्यातील सरसगड किल्ल्याशी निगडीत असलेल्या नोंदी या सर्वांचा विचार करता उपरोक्त समाधी ही त्यांचीच आहे हे सिद्ध होते.

संदर्भ व टिपा :

१.        चापेकर नारायण, चापेकर चित्पावन, आर्यसंस्कृती पुणे, १९३८ पृ. २२२.

२.        चित्तपावन (शांडिल्य) जोशीकुलवृत्तान्त, पुणे, पृ. ४९३.

३.        भावे वासुदेव, मुसलमान पूर्व महाराष्ट्र खंड-१, वा. कृ भावे पुणे १९४६ पृ. ३०३.

४.        सुधागड दर्शन,सुरेश पोतदार, सुनिता पोतदार, पाली, २००० पृ. ६६.

५.        मुसलमान पूर्व महाराष्ट्र, पूर्वोक्त, पृ. ३०३.

६.        सुधागड दर्शन, पूर्वोक्त, पृ. ६७.

७.        मुसलमान पूर्व महाराष्ट्र, पृ. २७३

८.        गो.स.सरदेसाई,  पेशवे दफ्तर  खंड – ३७, गर्व्हमेंट प्रेस, मुंबई १९३४, पृ. ५३.

९.        कित्ता पृ. ४९

१०.      कित्ता पृ. १८९.

११.      कित्ता पृ. १९०.

१२.      वाड ग. चि, सवाई मा. यांची रोजनिशी खंड १, डे व्ह ट्रा., पुणे १९०८ पृ.२४.

१३.      चित्तपावन (शांडिल्य) जोशीकुलवृत्तान्त, पूर्वोक्त, पृ.४९३.

१४.      सवाई माधवराव यांची रोजनिशी खंड १,पृ. ३२३.

१५.      कित्ता पृ. १४३, १४४.

१६.      चित्पावन, पूर्वोक्त पृ.२२२.

१७.      भालचंद्र आकलेकर, भंडारी समाजाचा इतिहास, पृ. १०-११.

१८.      वाड ग. चि. थो. मा. यांची रोजनिशी खंड २, डे व्ह. ट्रा., पुणे, १९११पृ.११६ – ११८, १२८.

१९.      सवाई माधवराव यांची रोजनिशी खंड-३,पूर्वोक पृ.२०९.

२०.      कित्ता पृ. २८-३०.

२१.      महाराष्ट्र इतिहास,(गोविंदराव काळे दप्तर) पुणे पृ. ९- ११.

२२.      सवाई माधवराव रोजनिशी खंड -३ पूर्वोक्त, पृ. ३०१ – ३०२.

२३.      कित्ता पृ. १९ – २०.

२४.      कित्ता पृ. २८७-२९०.

२५.      सवाई माधवराव रोजनिशी खंड-१, पूर्वोक्त पृ. १७१-१७२.

२६.      प्रवीण कदम यांची १५ मे २०२० रोजी घेतलेल्या मुलाखतीनुसार

Leave a Comment

error: Content is protected !!