लेखक : श्री. संदिप मुकुंद परब
प्रस्तावना :–
मौजे –तिवरे, ता.सुधागड, जि.रायगड येथे राज्य महामार्ग क्र.९२ लगत असलेल्या शिव मंदिराच्या मागील बाजूस संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी असून त्यावर त्यांच्या नावाचा समाधी लेख ही सुस्थितीत आहे. किल्ले सुधागड हस्तगत करणेकामी संभाजी हैबतराव देशमुख यांनी पराक्रम केला होता. त्याकरिता त्यांना मराठेशाहीतील पंतसचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी मौजे कान्हिवली हे गाव इनामपत्राच्या आधारे दिले होते. सदरील इनामपत्रावर ते राहत असलेल्या स्थळाचा उल्लेख तोl अश्रेधारणे असा आहे. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीतील १ मे,१६५६ चा जाबता अभ्यासीला असता त्यात सुभा चेऊल मध्ये खालील मामले व तर्फ नमूद केलेले होते.
वरीलप्रमाणे अश्रेअधारणे हे सुभा चेऊल चाच एक तर्फ असून सद्यस्थितीत अश्रे उर्फ आसरे हे गाव सुधागड तालुक्यात येत असून अधारणे हे गाव पेण तालुक्यात येते.१ सुधागड हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका असून पूर्वी कोकणातील ठाणे व रायगड जिल्ह्यांना उत्तर कोकण असे संबोधले जाई. सदरचा भाग हा दक्षिण कोकणपासून बाणकोटच्या खाडीने विभागला होता. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे दक्षिण कोकणात येत असत.२ आज मितीस सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांचे वंशज मौजे-कान्हिवली, तिवरे, अधारणे व दहीगाव येथे वास्तव्यास असून दहीगाव येथील वंशजांकडून अधिक माहिती जाणून घेतली असता असे कळले की त्यांच्या घराण्याकडे देशमुखीचे अधिकार हे मुसलमानी अमदानीपासून ते मराठेशाहीतील पंतसचिव यांचे कारकिर्दीपर्यंत अविरत चालू होते.
सदरची बाब अधिक ठळकपणे स्पष्ट करणे करिता उत्तर कोकणातील सुधागड तालुक्यामधील देशमुखी वतन (खोती वतन) पध्दतीसंदर्भात विस्तृत माहिती व मध्ययुगीन राजकीय घडामोडींचा घटनाक्रम जाणून घेणे महत्वाचे आहे.
देशमुखी वतन (खोती वतन) पध्दत :-
सदर दहिगाव वशंजांतील संभाजी हैबतराव देशमुख यांच्या बंधूंकडे देखमुखी वतन होते.त्यांच्याकडे देशमुख या पदवीचे अधिकार हे निजामशाहीपासून चालत आले होते. परंतु उत्तर कोकणावर १६३६ साली आदिलशाही राजवट स्थापन झाल्यानंतर आदिलशाही राजवटीत खोती पध्दतीस प्रथमपासूनच प्राधान्य देण्यात आले असल्यामुळे सदरच्या काळात त्यांना कौलनामे देऊन त्यांच्या पूर्वीच्याच देशमुखी वतनावर खोतीरुपाने कायम करण्यात आले. तसेच त्यांना देण्यात आलेले खोती वतन हे त्यांना इनाम मिळाले होते. 3
——————————————————————————————————————–
३. वतन : या शब्दातूनच त्या माणसाला परंपरेने मिळणारा अधिकार व त्यापासून त्याला होणारे फायदे स्पष्ट होतात.
देशमुख :देशमुख ही संस्था प्राचीन असली तरी देशमुख या शब्दाचा वापर हा मुसलमानी काळापासूनच केलेला आढळतो. बखरीत कागदपत्रांत जमिनदार हा देशमुख या अर्थाने आहे. देशमुख हा परगण्याचा वतनदार अधिकारी असून राजाकडून त्याला वतन दिले जाई. सदरचे वतन हे सामान्यत: मराठा समाजाकडे असे. सरकार व रयत यांच्यामधील दुवा म्हणजेच देशमुख होय. देशमुख हा परगण्यातील सर्व पाटलांचा नायक असून तो त्यांच्या सर्व कारभारावर देखरेख ठेवत असे. (अ.रा. कुलकर्णी, शिवकालीन महाराष्ट्र, राजहंस प्रकाशन, पुणे, सन १९९३, पृ.क्र. ३५, ३६)
मध्ययुगीन कोकणच्या राजकीय इतिहासातील घटनाक्रम :-
कालखंड : घटना
- इ. स.१६३६ : मोगलांनी कोकणातील निजामशाही खालसा करुन अदिलशाहीकडे सदरचा मुलूख सुपूर्द केला.४
- इ. स.१६४६ ते इ. स. १६५८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण भागातील सरसगड, तळा, घोसाळगड, भुरप (भोरप- सुधागड), कांगोरी हे किल्ले ताब्यात घेतले.५
- इ. स. २६ ऑग. १६६६ : पुरंदर तहाच्या वेळी शिवाजी महाराज्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांच्या यादीत सुधागड किल्ल्याचे नाव होते.६
- इ. स. १६७१ – ७२ : शिवाजी महाराजानी सुधागड किल्ल्याच्या डागडूजी व नविन वास्तू बांधकामाकरिता अंदाजपत्रकात रु.५,०००/- ची तरतुद केली होती.७
- इ.स. १३ नोव्हेंबर १६८१ : छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांची पातशाहपूर (धोडसे, पाली, पातशाहपूर) येथे भेट झाली.८
- इ.स. १६८२ ते इ.स. १६८६ : छत्रपती संभाजी महाराज व मोगल यांच्या कोकणात निकटच्या लढाया सुरु होत्या.९
- इ.स. १ फेब्रुवारी १६८९ : छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्र्वर येथे अटक झाली.१०
- इ.स. १२ फेब्रुवारी १६८९ : राजाराम महाराज यांना मंचकी बैसविले.११
- इ.स. ११ मार्च १६८९ : छत्रपती संभाजी महाराज यांचा तुळापुरी शिरच्छेद केला.१२
- इ.स. १६८९ : छत्रपती संभाजी महाराजाच्या वधानंतर उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले. सिद्दी व आंग्रे यांनी उत्तर कोकणात आपला ताबा मिळविला. मोगलाच्यावतीने सिद्दीने उत्तर कोकणातील वसूल जमा करण्यास सुरुवात केली.१३
- इ.स. २३ ऑक्टो. १६९० : प्रतापगड, तोरणा, रोहीडा वैगरे किल्ले जिंकून घेतल्याबद्दल शंकराजी नारायण यांस छत्रपती राजाराम महाराज यांनी सचिव पद बहाल केले.१४
- इ.स. १६९४ : शंकराजी नारायण यांचे पदरी असलेल्या संभाजी हैबतराव देशमुख यांनी मोगलांकडून सुधागड किल्ला जिंकून घेतला.(कालखंडाचा उल्लेख नसल्याने सदरची घटना दरम्यानच्या काळात घडली असावी)
- १५ डिसेंबर १६९४ : संभाजी हैबतराव देशमुख यांना शंकराजी नारायण यांचेकडून मौजे – कान्हिवली हे गाव इनाम म्हणून मिळाले होते.
- १८ सप्टेंबर १६९६ : गोविंद बाबाजी, रंगाजी अनंत व निलाजी कुलकर्णी ता. खारापाट उर्फ नागोठणे यांनी खान साहेब आरमार यांना दिलेल्या कतब्यावर साक्षीदार म्हणून संभाजी हैबतराव देशमुख यांच्या दहिगांव येथील देशमुखी अधिकार असलेले वंशज बंधू दादाजी हैबतराव देशमुख तोI आसरे अधारणे यांची साक्षीदार म्हणून सही आहे.
- इ.स. १६९४ – इ.स. १६९५ : जेधे शकावलीनुसार कोरीगड मोगलांनी जिंकल्या नंतर यादो समाराज व महादजी बाजी यांनी आपल्या कबील्यासह भोरप (सुधागड)किल्ल्याचा आश्रय घेतला.१५
- इ.स. १६९८ : सचिवपद प्राप्त झाल्यानंतर शंकराजी नारायण यांना त्यांचे ताब्यात असलेल्या प्रांता शिवाय सुधागड, तोरण, पुरंदर, मृगगड, वर्धनगड, कान्हेरी गड, मनमोहन, रोहिडा, राजगड, सिंहगड व धनगड हे किल्ले व त्याच्या सभोवतालचा परिसर त्यांच्या ताब्यात येऊन पुढे तो त्यांच्या जहागिरीचा एक भाग झाला.१६
- इ.स. १७०० : छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू झाला व त्यानंतर त्यांचे पुत्र शिवाजी यांची मुंज व राज्याभिषेक होऊन त्यांच्यावतीने ताराबाई साहेब राज्यकारभार चालवू लागल्या.१७
- ६ फेब्रु. १७०६ : शाहू महाराजांस बादशहाने प्रतिबंधातून मुक्त केले.१८
- इ.स. १७०७ : शाहू महाराजांनी ताराबाईच्या फौजेचा खेड कडूस येथे पराभव केला.१९
- इ.स. १७०७ : राजगड किल्ला शाहू महाराजांनी घेतला त्यास सचिव शंकराजी नारायण यांनी विरोध न करता स्वामी निष्ठा व वचन परिपालन साधन्या करीता जहागिरीचा त्याग करुन ते अंबवडे येथे गेले व तेथेच नोव्हेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.२०
- इ.स. १७०७ : छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी नारायण यांचे औरसपुत्र नारो शंकराजी यांना सचिवपद देऊन त्यांच्या जहागिरी संदर्भातील नवीन सनद करुन दिली.२१
- इ.स. १७३७ : पंतसचिव नारो शकंराचा मृत्यू झाला.२२
- इ.स. १७४० : नारो शंकर सचिव यांचे मृत्यूनंतर शंकराजी नारायण यांचे दत्तकपुत्राचे पुत्र चिमणाजी नारायण हे सचिव पदावर आले ते नेरे येथील वाडयात राहत असून तेथील त्यांचा वाडा जळल्यामुळे त्यांनी नीरा नदीकाठी भोर येथे नवीन वाडा बांधला आणि भोर हे गाव त्यांनी आपल्या जहागिरीचे ठिकाण म्हणून निवडले. तेव्हापासून सचिवाच्या जहागिरीस भोर संस्थान हे नाव प्राप्त होऊन भोर हे राजधानीचे ठिकाण झाले.२३
- ८ मार्च १९४८ : अशाप्रकारे मौजे दहिगाव घराण्याजवळची देखमुखी ही मुसलमानी अमदानीपासून ते भोर संस्थान असेपर्यंत म्हणजेच दिनांक ८ मार्च १९४८ पर्यंत चालू होती.२४ त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कालखंडातील कुळ कायदा येईपर्यंत सदर खोती त्यांच्याकडे चालू होती.
ऐतिहासिक ग्रंथातील नोंदी :-
- संभाजी हैबतराव देशमुखांच्या पराक्रमा संदर्भातील नोंद :- संभाजी हैबतराव देशमुख तोI (तर्फ) अश्रे धारणे यांनी किल्ले सुधागड हस्तगत करण्याकामी केलेल्या पराक्रमासंदर्भातील पहिला उल्लेख सन १९०३ साली अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या भोर संस्थानचा इतिहास या ग्रंथात खालीलप्रमाणेआढळतो. सुधागड किल्ला बिकट, चढून जाऊन एकदम हल्ला करण्यास मार्ग नाही असे पाहून त्यांच्या धारकऱ्यांनी तो युक्तीनेच छापा घालून घेण्याची खटपट केली आणि तो शेवटासही गेली. ‘‘साखरदऱ्यांत मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. तेव्हा संभाजी हैबतराव, राघोजी गौळी, गणजी शिंदे न्हावी, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण, गंगाजी शिंदे वगैरे मुख्य धारकरी असून त्या सर्वांचा सरदार मालोजी भोंसले नांवाचा होता. त्याच्या हाताखाली जाधव सरनाईक आणि काळू हे दोघे होते. हे तिघेजण प्रथम माळ लावून किल्ल्यावर रात्रीं चढले याशिवाय किरकोळ मंडळी होती. या धारकऱ्यांस उभे करुन त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढें जाऊन साखरदऱ्याचे माथा गेले. तो गस्त उजवा घालून गेली. तेव्हा संभाजीरावानें पंचविसानें पुढे जाऊन गस्त मारिली व बोकडसिलेचा पाहारा मारला आणि मागे फिरले, तो मागून बाबाजीराव आले तेव्हा त्यांची हटकाहटक होऊन हाणाहाण झाली तेव्हा राघौजी गौळी यांनी हाती चांगला भाला होता तो खलवलविला. तेव्हा ….. राव असतील तेव्हा हटकाहटक झाली. तेव्हां एकमेकांची ओळख निघाली. एक जागा होऊन पुढें श्री भोराईच्या टप्प्यावरी गेले आणि तेथें जाऊन उभे राहिले तों सदरेंतून किल्लेदार व लोक धांवून आले. तेथें त्यांची यांची हाणाहाण जाहली. ते समयीं किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.”२५सदर उल्लेखासंदर्भातील कालखंडासंदर्भात लेखकाने कोणत्याही विशिष्ट अशा कालखंडाचा शकाच्या माध्यमातून उल्लेख केलेला नसून सदरचा पराक्रम हा मोगलांनी सुधागड किल्ला घेतला त्यावेळेचा असून सुधागड तालुक्यातील किल्ले सुधागड या किल्ल्याशी निगडीत आहे.
- संभाजी हैबतराव देशमुख यांना मिळालेल्या इनामपत्राच्या संदर्भातील नोंद:– सदरचा उल्लेख शिवचरित्र साहित्य खंड-१० मध्ये पोलादपूरच्या चित्रे दप्तरातून उपलब्ध झालेल्या पत्रानुसार खालीलप्रमाणे आढळतो. ले-२३ – पोलादपूर चित्रे – श.१६१६ माग शु॥९ – इ.१६९४ डिसें – श्री राजश्री बहिरोजी त्रिमल नामजाद व कारकून सरसुभा प्रांत चेऊल गोसी. र्द अखडित लक्ष्मी अलकृत राजमान्य …. श्रोाशंकराजी नारायेण नमस्कार सु॥ खमस तिसैन अलफ संभाजी हैबतराव देशमुख तोI अश्रेधारणे हे राज्यता कष्ट मेहनत ऐकनिष्टपणे करीत अले किले सुधागड गनीमापासून हस्तगत केला ते समई याणा धारे मालेस लागून किला फते करुन स्वामिकार्यसिध्दी केली त्याजवरुन मेहरबान होऊन हे मर्दाने साहेब कामाचे अैसे जाणून इनाम मौजे कान्हवली ताI मजकूर हा गाव माIरनिल्हेस खुद जातीस दिल्हा तसे तरी कुलबाब कुलकानु खेरीज हाकदार व इनामदार वजा करुन मौजे मारचा आकार होईल तो इनामखर्च लिहीत जाणे या पत्राची प्रतीं लेहून असल पत्र भोगवटीयास परतोन देणे प्रतिवर्शी नूतन पत्राची आक्षेप न करणे जाणिजे छ ७ माहे जमादिलौवल.26किल्ले सुधागड हस्तगत करण्याकामी संभाजी हैबतराव देशमुख यांना १६९४ मध्ये पंतसचि शंकराजी नारायण याचे कडून उपरोक्त इनामपत्र मिळाले त्यानुसार तोI अश्रेधारणे यादरम्यान संभाजी हैबतराव देशमुख यांचे वास्तव्याचे ठिकाण असून मौजे कान्हीवली हा गाव त्यांना इनाम करणेत आला असे या पत्राच्या आधारे स्पष्ट होते.
समाधी :-
मौजे तिवरे, ता.सुधागड, जि. रायगड येथे राज्य महामार्ग ९२ लगत असलेल्या शिव मंदिराशेजारी सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी आहे. समाधीची लांबी ३ फूट ७ इंच, रुंदी ३ फूट ६ इंच असून उंची २ फूट २ इंच आहे. सदर समाधीचे बांधकाम कातळ दगडात आहे. सदर समाधीची एक बाजू मोडकळीस आली असून समाधीचा इतर भाग सुस्थितीत आहे. समाधीच्या चारही बाजूस छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे जमिनीलगतच्या बाजूस १० इंचात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. समाधीच्या मुख्य चौथऱ्याच्या मध्यभागी १३×१६ इंचाच्या चौकोनात समाधी लेख कोरलेला आहे.त्याचे वाचन खालील प्रमाणे आहे.
संभाजीराव
नीरतंर बहिर
जीरावश
के १७.२२

समाधी लेख :-
डॉ.मोरेश्वर दिक्षीत यांनी मराठेशाहीतील शिलालेख या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील शके १४९७ पासून शके १८०० पर्यंतचे सुमारे १५२ शिलालेख संग्रहित करुन त्याचे लेख कोरण्याकरिता वापरण्यात येणारा दगड, लेखाची जागा, लेख कोरण्याची पध्दत, लेखाची भाषा व लिपी, लेखाचे लिखाण, लेखाचा मायना, लेखाचा कालखंड व व्यक्तिनाम या विविध अंगाने विस्तृत असे विवेचन केलेले आहे याचा आधार घेऊन मौजे तिवरे, ता.सुधागड, जि. रायगड येथील सरदार संभाजी हैबतराव यांच्या समाधीवरील समाधी लेखाचे निरीक्षण केले असता खालील बाबी निदर्शनास येतात
- प्राप्ती स्थळ : मौजे तिवरे येथील संभाजी हैबतराव यांची समाधी
- लेखासाठी वापरण्यात येणारा दगड : मराठेशाहीतील लेख कोरण्यासाठी कोणताही विशिष्ट प्रकारचा दगड वापरावा असा प्रघात नसे. बहुसंख्य लेखाना साधा कातळाचा दगड वापरण्यात येई.२८अशाच प्रकारे उपरोक्त समाधी ही साध्या कातळ दगडात बांधली आहे.
- लेखाची जागा: मराठेशाहीतील समाध्यांवरील लेख बहुशः चौथऱ्याच्या मुख्य बाजूस वेगळा चौकोन राखून त्यात व्यक्ती किंवा देवता यांचा उल्लेख केला जाई.२९ त्याचप्रमाणे सदर समाधी लेख हा चौथऱ्याच्या मुख्य बाजूस मध्य भागी वेगळा चौकोन राखून लिहिलेला असून त्यात दोन व्यक्तींच्या नावांचा उल्लेख आहे.
- लेख कोरण्याची पध्दत: मराठेशाहीत लेख कोरण्याच्या दोन पध्दती होत्या. एकीत लेखाची अक्षरे दगडावर छिन्नीने खोदून घेत. दुसऱ्या पध्दतीत अक्षरे उठावात कायम ठेवून उरलेला भाग तीक्ष्ण हत्याराने फोडून सपाट करीत.३० सदर लेखाची कोरण्याची पध्दत ही वर उल्लेख केल्याप्रमाणे पहिल्या पध्तीनुसार असून वरील छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे सदर लेखावर खडू लावला असता दगडाचा पृष्ठभाग हा पांढरा व अक्षरे काळी दिसत आहेत.
- लेखाची भाषा व लिपी : १३-१४ व्या शतकात देवनागरी लिपीचा विकास पूर्णपणे होऊन त्याचे स्वरुप सध्याच्या अक्षराप्रमाणे झालेले होते.३१ त्यामुळे सदर लेख हा मराठी भाषेत असून तो देवनागरी लिपीत कोरलेला आहे.
- लेखाचे लिखाण व वर्णन : शिलालेख चार ओळीचा आहे. सदर लेख हा मराठेशाहीतीलच लेखाप्रमाणेच ओबडधोबड स्वरुपाचा असून ओळीत जशी जागा सापडेल तसा कोरलेला आहे.३२त्यामुळे शब्द ओळीत पूर्णव्हावा याची दक्षता बाळगली गेली नाही. उदा. बहिर्जी, व शके त्यामुळे ते वाटेल तसे तुटलेले आहेत.
- लेखाचा मायना: मराठेशाहीतील शिलालेखात “श्री मार्तंड चरणी तत्पर। अप्पाजी सोमवंशी सरलष्कर निरंतर व पुढें सनाचा उल्लेख” अशा प्रकारचा मायन्याचा अनुवाद पुष्कळ वेळां केलेला दिसतो. कागदपत्रावर जे शिक्के उठवित त्यांतही ह्याच धर्तींचा मजकूर येत असल्यामुळे, लेख कोरवितांना हाच आदर्श कोरणारांचे पुढें असे. तसेच या कामासाठी नियुक्ती केलेला वर्ग शिक्षणामुळे यथातथाच असल्यामुळे लेख कोरण्यात पुष्कळ चुका आढळत.३३ सदर समाधी लेखाच्या मायन्यात ‘‘संभाजीराव नीरतंर बहिर जीरावश के १७.२२’’ असा असून दोन व्यक्तींची नांवे नमूद असून बहुतेक लेखात पिता पुत्रांची नावे दर्शविण्यासाठी बिन व सुत असे शब्द वापरतात. परंतु सदर लेखात अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केलेला नाही. तरी प्रथम नाव हे पित्याचे असून नंतर येणारे नाव हे पुत्राचे आहे तसेच ‘निरंतर’ या शब्दांतील ‘नि’ हे अक्षर ऱ्हस्व असून दीर्घ कोरले आहे या व अशा इतर बाबीवरुन असे लक्षात येते की, लेख कोरणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण कमी झालेले आहे.
- लेखाचा कालनिर्देश व कालखंड : समाधी लेखामध्ये शेवटच्या ओळीत शके (सन) १७.२२ दर्शविलेला आहे. महाराष्ट्रात सामान्यतः शक कालगणनाच प्रचलित राहिल्याने३४ सदर समाधी लेखाचा कालखंड हा शकाने दर्शविलेला असला तरी प्रत्यक्षात तो सनामध्ये नोंदला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, सदरचा लेख कोरणारी व्यक्ती अज्ञानी असल्याने त्यास शक व सन फरक कळलेला नाही.
- लेखातील व्यक्तिनाम : सदरचा समाधी लेख हा संभाजीराव व बर्हिजीराव यांचे नाव दर्शवितो. सदरच्या समाधी लगत संभाजी हैबतराव देशमुख यांच्या सती गेलेल्या पत्नीची सतीशिळा असून उपरोक्त छायाचित्रात दाखविलेल्याप्रमाणे सतीशिळेच्या पहिल्या चौकटीत चंद्र, सुर्य, दुसऱ्या चौकटीत “भडखंबा” (सतीचा हात) तर तिसऱ्या चौकटीत सती गेलेल्या स्त्रीला त्यावेळी हयात असलेल्या अपत्यांची छायाचित्र दर्शविली आहेत.३५ छायाचित्राचे निरीक्षण करता असे दिसून येते की, संभाजी हैबतराव यांच्या पत्नी सती गेल्या असता त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. पैकी मुलाचे नाव समाधी लेखात दर्शविल्याप्रमाणे बर्हिजीराव होते व त्यांनीच आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ या दोन्ही समाध्यांची निर्मिती केलेली दिसते.

निष्कर्ष :-
१. सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांच्या वास्तव्यासंदर्भातील निष्कर्ष :-
- ऐतिहासिक ग्रंथातील किल्ले सुधागड हस्तगत केलेल्या पराक्रमाची नोंद, किल्ले सुधागड हस्तगत केल्याकामी देण्यात आलेले इनामपत्रातील वास्तव्यासंदर्भातील तर्फ अश्रेधारणेचा उल्लेख हा १ मे १६५६च्या जाबत्यानुसार सुभा चेऊलचाच एक भाग होता. तसेच दहिगाव येथे वास्तव्यास असलेल्या वंशजांकडून मिळालेल्या गहाणखतात “मौजे-दहिगाव आसरे अधारणे व इनाम वतनी खोती” अशी नोंद वास्तव्यासंदर्भात आढळते.
- सद्यस्थितीत समाधी असलेले मौजे तिवरे हे गाव व त्या गावात, मौजे कान्हिवली, मौजे आधारणे तसेच मौजे दहिगाव या गावात वास्तव्यास असलेल्या हैबतराव देशमुखांचे वंशज.
- समाधी लेखातील संभाजी हैबतराव देशमुख यांच्या नावाचा उल्लेख.
२. संभाजी हैबतराव यांच्या दहिगाव येथील वंशजाकडील देशमुखीचे अधिकारा संदर्भातील निष्कर्ष :-
- बहमनी राज्याची शकले उडाल्यानंतर ५ शाह्यां अस्तित्वात आल्या. कोकणाचा विचार करता विजापूरचे आदिलशाहाची सत्ता दक्षिण कोकणावर तर अहमदनगरच्या निजामशाहाची सत्ता उत्तर कोकणावर होती.१४व्या व १५व्या शतकात बहमनी अमदानीत प्रसिध्द व पराक्रमी मराठे सरदारांची नावे सापडत नाहीत. ५ शाह्यां झाल्यावर त्या एकमेकांशी आपापसात भांडू लागल्यावर त्यांना मराठे सरदार व मुत्सद्यांची प्रकर्षाने गरज भासू लागली म्हणून त्यांचा उपयोग अहमदनगराची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही करु लागल्या. सदरच्या कालखंडात उत्तर कोकणात निजामशाहीची सत्ताहोती.३६
- इ.स.१६०० ते १६३६ पर्यंत निजामशाही व मोगलांमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. अहमदनगरच्या निजामशाही सरदार उदा. मलिकंबर याने मोगलांपासून निजामशाहीचे संरक्षण करण्याकरता जो प्रखर संघर्ष केला त्यात त्याने मराठे सरदारांना पुढे येण्याची संधी दिली त्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच शहाजीराजे भोसले होत.३७
- उपरोक्त शोध निबंधात प्रस्तावनेत नमूद केलेल्या सुधागड तालुक्यातील मध्ययुगीन राजकीय घडामोडींचा घटनाक्रम पाहता संभाजी हैबतराव देशमुख यांच्या दहिगाव येथील वंशाजांकडील देशमुखीचे अधिकार अनुक्रमे निजामशाही, आदीलशाही व मराठे शाहीतील भोर संस्थानापर्यंत अविरत चालू होते.
३. सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांच्या कारकिर्दीतील कालखंडाचे निष्कर्ष :-–
- उपरोक्त समाधी लेखाची ‘‘मराठेशाहीतील शिलालेख” या ग्रंथात मोरेश्वर दिक्षित यांनी सुमारे १५२ शिलालेखांचे त्यांच्या विविध अंगानी केलेल्या विवेचनाचा आधार घेऊन निरीक्षण केले असता सदरचा शिलालेख हा मराठेशाहीतील आहे हे स्पष्ट होते.
- समाधी लेखातील (सन) १७.२२ तसेच इनामपत्रातील (सन) १६९४ समकालीन आहे.
उपरोक्त निष्कर्षानुसार संभाजी हैबतराव देशमुख यांच्या दहिगाव येथील बंधूंकडे देशमुखीचे वडिलोपार्जित अधिकार निजामशाहीपासून मराठेशाहीतील भोर संस्थानच्या पंतसचिवांच्या कारकिर्दीपर्यंत अविरत चालू होते.तसेच सदरच्या समाधी लेखातील कालखंड व डॉ.दिक्षित यांनी अभ्यासलेल्या समाधी लेखांचे कालखंड हे मराठेशाहीतील असून संभाजी हैबतराव देशमुख यांना मिळालेल्या इनामपत्रातील कालखंडाशी निगडीत आहे. अशाप्रकारे मौजे तिवरे येथे असलेली समाधी ही सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांचीच आहे, हे स्पष्ट होते.
संदर्भ व टिपा :
१. गजानन मेहेंदळे, राजा शिवाजा, खंड-१, भाग २ डायमंड प्रकाशन, पुणे,पृ. ११६१, ११६२.
२. वि.गो. खोबरेकर, कोकणचा राजकीय इतिहास (इ.स. पूर्व ते इ.स.१८२०),पृ.II
३. वि.गो.खोबरेकर, मराठेकालीन कोकणचे सामाजिक व आर्थिक जीवन, इ.सं.शो.म., मुंबई, १९२७, पृ.३०.
४. कोकणचा राजकीय इतिहास, उपरोक्त , पृ.IV
५. कित्ता , पृ.
६. वि.का राजवाडे, मराठयांच्या इतिहासाची साधने – खंड १, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे, २००२, पृ. १०, ११
७. संकलन – भा.इ.सं.म., शिवकालीन पत्रसार-संग्रह – खंड २, शिवचरित्र कार्यालय, पुणे,१९३०, पृ. ४१३
८. गो.स.सरदेसाई, मराठी रियासत खंड -२, पॉप्युलर प्रकाशन, पुणे- १९८९, पृ.२८, २९.
९. कोकणचा राजकीय इतिहास, उपरोक्त. पृ.
१०. गो. स. सरदेसाई, उपरोक्त,पृ.११०.
११. वा.सि.बेंद्रे, श्री.छ.राजाराम म.आणि नेतृत्वहीन हिं.स्व.मोगलांशी झगडा, लोक वाडःमय, मुंबई-४,१९७५,पृ.३०.
१२. गो. स. सरदेसाई, उपरोक्त ,पृ.११२
१३. कोकणचा राजकीय इतिहास, उपरोक्त,पृ.
१४. गो. स. सरदेसाई, उपरोक्त ,पृ.१७४, १७५.
१५. अ.रा.कुलकर्णी, जेधे शकावली-करिना,मानसन्मान प्रकाशन, पुणे, १९९९, पृ.१८८, १८९, १९०, १९१.
१६. वा. ना. जोशी, राजा श्रीमंत रघुनाथराव पंडित पंतसचिव राजे साहेब संस्थान भोर यांचे चरित्र, भोर, १९३९,पृ.७
१७. गो. स. सरदेसाई, उपरोक्त,पृ.२६०.
१८. कित्ता,पृ.३०६.
१९. वा. ना. जोशी, उपरोक्त,पृ.१२.
२०. कित्ता,पृ.१४.
२१. अनंत भागवत, भोर संस्थानचा इतिहास, ज्ञान प्रकाशन,पुणे, १९०३, पृ.१०९.
२२. वा.ना.जोशी, उपरोक्त, पृ.२०
२३. कित्ता , पृ.२१
२४. सुरेश पोतदार, सुधागड दर्शन, सुनिता पोतदार, पाली, २०००, पृ.११
२५. अनंत नारायण भागवत, उपरोक्त,पृ.२६,२७.
२६. शां.वि.आवळसकर, शिवचरित्र साहित्यखंड-१०, भा.इ.सं.मं.स्वीय ग्रंथमाला क्र. ८६, १९५३, पृ.३६, ३७.
२७. श.ना.जोशी / ग. ह. खरे, शिवचरित्र साहित्यखंड-३, चित्रशाळा प्रेस पुणे, १९३०, पृ.३१.
२८. मोरेश्वर दिक्षीत, मराठेशाहीतील शिलालेख, १९६२,पृ. १४.
२९. कित्ता,पृ.१३.
३०. कित्ता,पृ.१४
३१. कित्ता,पृ.१६
३२. कित्ता,पृ.१५
३३. कित्ता,पृ.१९
३४. कित्ता,पृ.१८
३५. सदाशिव टेटविलकर, महाराष्ट्रातील वीरगळ, श्री.विश्वनाथ साळवी, ठाणे, सन २०१४, पृ. ८७, ८८.
३६. कोकणचा राजकीय इतिहास, उपरोक्त. पृ.१६, १७.
३७. कित्ता,पृ. ३२.